*भाजपा जिल्हा आदिवासी आघाडीचे उपविभागीय अधिकारी रामटेक यांना विविध मागण्यांचे निवेदन*
*एक महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला*
देवलापार प्रतिनिधी – पुरुषोत्तम डडमल
देवलापार – भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा आदिवासी आघाडीच्या वतीने रामटेक तालुक्यातील आदिवासी भागातील देवलापार येथील विविध समस्या सोडविण्यासाठी आज दुपारी १वाजताच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांना आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री ज्ञानेश्वर ढोक यांच्या नेततृत्वात एक निवेदन देण्यात आले.व एक महिन्याच्या आत या समस्यांचे निराकरण झाले नाही तर तीव्र आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा ईशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने देवलापार ला पूर्ण तहसिल कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा, तहसील कार्यालयातील रिक्त असलेले अप्पर तहसिलदार पद त्वरीत भरण्यात यावे,७२गावाचा महसूल रेकॉर्ड रामटेक तहसिल कार्यालयातून आणून देवलापार अप्पर तहसिलदार कार्यालयातच कामकाज सुरू करण्यात यावे,अप्पर तहसीलच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर पोलीस स्टेशन चे नवीन बांधकाम करण्यात यावे व आदिवासी विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय देवलापार ला सुरू करण्यात यावे. या मागण्या समावेश करण्यात आला.
रामटेक तालुक्यातील आदिवासी बहूल भागात आदिवासी लोकांना स्वातंत्र्यापासून ते आजतागायत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . त्यांना राजस्व विभागाची शेती विषयक कामे करण्यासाठी २५ ते ३० कि.मी. वरून रामटेकला पैसे खर्च करून जावे लागते.त्यांत त्यांचा पैसा तर जातोच परंतु वारंवार एकाच कामासाठी नेहमी कार्यालयाचे खेटे घालावे लागत असल्याने वेळही जातो.या भागात गरीब आदिवासी समाज आहे.त्यांच्या सर्वांगिण उन्नतीकरीता शासनाद्वारे विविध योजना राबवितात.त्यातलाच एक भाग म्हणून देवलापार येथे एक वर्षांपूर्वी अप्पर तहसिलदार कार्यालय शासनाने दिले.परंतू अनेक दिवसांपासून येथील अप्पर तहसिलदार हे रिक्त असल्याने या आदिवासी भागातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.
शासनाने एक महिण्याच्या आंत या समस्या सोडवाव्यात अन्यथा “ चक्का जाम आंदोलन करुन साखळी उपोषणावर अनेक आदिवासी बांधव बसणार आहेत असा ईशारा यावेळी देण्यात आला.यावेळी योगराज टेकाम अध्यक्ष देवलापार मंडळ आदिवासी आघाडी, संजय मुलमुले,बालचंद बादुले, शत्रूघन उईके, नंदकिशोर कोहळे, बलदेव कुंभरे, मनीष वाडीवे, रमेश कोरचे, शोभेलाल मडावी,शिवप्रसाद अमृते, सुभाष मानकर, डॉ. विशाल कामदार,भुपेंद्र गणविर,आदी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज