*मोहपा शहरांमध्ये दुषित पाणीपुरवठा*
*नागरिकांना आर्थिक फटका ; प्रशासन लक्ष देईल काय?, मुख्याधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनेकांचे आरोग्य धोक्यात, पालिकेचा भोंगळ कारभार चाहाट्यावर*
विशेष प्रतिनिधि
नागपूर – जिल्ह्यासह मोहपा शहरात सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना मोहपा शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र ते पाणीही गढूळ व दूषित येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिक सतत तक्रार करीत आहे मात्र त्यानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोहपा शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नळांद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र ते पाणीही गढूळ व दूषित येत असल्याने 8 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मोहपा शहराला खुमारी जलाशयातुन पाणीपुरवठा केला जातो व त्या जलाशयातून येणाऱ्या पाण्याचे गडबर्डी येथे असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेतून पाणी शुद्ध केल्या जाते. मात्र नगरपालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणेची देखभाल गेल्या दोन वर्षात झाली नसून सदर यंत्रनेचा मीडिया दरवर्षी बदलावा लागतो मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप पदाधिक्यांनी केला आहे.तसेच ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. या पाईप लाईनजवळील खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचते. त्याच पाण्याचा शिरकाव पाईपलाईनमध्ये होतो. त्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नसल्याची नागरिकांची ओरड आहे. पाईपलाईन,व्हाल मागील काही वर्षांपासून नादुरुस्त आहे त्यामुळे पालिकेच्या गलथान कारभारामुळे येथील राहवासीयांना नाईलाजाने गढूळ पाणी प्यावे लागत आहे.
मोहपा येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे मोहपा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. नागरिकांना ठिकठिकाणी एकच समस्यांचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे दूषित पाण्याचा पुरवठा होय. विशेष म्हणजे पाणी जर दूषित येत असेल तर ते उकळून गाळून प्यावे असा उपरोधीक सल्लाही पालिका प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या जुनी असली तरी वर्षातून किती दिवस दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला याची नोंद प्रशासनाकडे नसली तरी कुठल्या ग्राहकाकडे किती पाणीपट्टी कर थकीत आहे याची मात्र तंतोतंत नोंद पालिकेकडे आहे. मात्र दूषित पाण्याच्या पुरवठ्यावर तेच प्रशासन मुग गिळून आहे.माहितीनुसार ज्या केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो त्या यंत्राची क्षमता कमी असून पाण्याचा पुरवठा दूषित होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. तू आता तर उन्हाळ्याची चाहूल लागताच दूषित पाणीपुरवठा होत आहे. फक्त ब्लिचिंग घातल्याने पाणी शुद्ध होत नाही. त्याला उपाय तरी काय अशी उत्तरे दिली जातात.
मोहपा या शहरात दूषित पाण्याची समस्या मुख्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.यावर कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र होते त्या ठिकाणची दूरवस्था पाहून प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात येतो. या समस्येकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पाण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी नागरिक संपर्क साधतात तर त्यांना त्यांचा फोन उचलणे सुद्धा गरजेचे वाटत नाही . समस्येबाबत मुख्याधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे ते काय उपाययोजना करतील हे कळू शकले नाही. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बेबंदशाही मुळे नागरििकावर ही समस्या येऊन ठेपलेली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.