*बौद्धिक मालमत्ता हक्काच्या संदर्भात जागृती होणे काळाची गरज-डॉ. अनिकेतकुमार गादे*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयातील संशोधन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या *” बौद्धिक मालमत्ता हक्काचे मूल्यमापन “* या विषयावर आभासी पध्दतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानसाठी प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक, संशोधक डॉ. अनिकेतकुमार गादे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी बौद्धिक मालमत्ता अधिकार हा कुठल्याही क्षेत्रातील, कोणत्याही वयाच्या क्षमताशील व्यक्तीला प्राप्त करता येऊ शकतो. आपल्या देशाची बौद्धिक संपदा देशाच्या आणि त्याला जन्माला घालणाऱ्या व्यक्तीच्या नावाने राहावी. यातून देशाचे बौद्धिक वैभव वाढावे, गुणवत्तापूर्ण कार्याला स्वामींत्व हक्क मिळावा, आपल्या कला, कल्पना, साहित्य, संशोधन याचा अविष्कार नावीन्यपूर्ण असेल, त्याची गुणवत्ता उत्तम असेल तर त्याला राजश्रय मिळावा यासाठी शासनाने बौद्धिक मालमत्ता अधिकार धोरण साकारलेले आहे. याप्रसंगी त्यांनी या अधिकाराचा फायदा कोण घेऊ शकतो, बौद्धिक मालमत्ता अधिकाराचे प्रकार किती व कोणते आहेत, त्याचे फायदे कसे आहेत, या अधिकारात पेटेन्ट ला कसे व किती महत्व आहे, पेटेन्टचा उगम कसा झाला, त्याचे स्वरूप, फायदे कोणते आहेत, त्याची नोंदणी आपण कशी करू शकतो, यासंदर्भात विस्तृत विवेचन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे ह्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयाने संशोधनात्मक दर्जा कसा गाठला हे सांगत स्वागतपर भाषण केले. आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. गिरीश काटकर यांनी महाविद्यालयातील संशोधनात्मक विकासाचा आढावा घेतला. संशोधन समितीचे समन्वयक डॉ. विजय चरडे यांनी तज्ज्ञ वक्त्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ कोमल ठाकरे यांनी तर आभार डॉ. प्रेरणा थोरात यांनी मानले. आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला पदव्युत्तर विभागाचे संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
.
Maharashtra News Media सच की आवाज