*चोरखुमारी शिवारात गुराख्यासह वीज पडून तिघांचा मृत्यू*
*दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले,किरकोळ जखमी*
*रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल*
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक – तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरिसिंह धोंडबा सोरते यांचे शेतात दिनांक 06 जुलै 2021 रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या सुमारास अचानक वीज पडून शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पाच पैकी तिघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरीसिंह सोरते यांची शेती आहे. सध्या पावसाळ्याची कामे सुरू असल्याने शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती.अचानक आभाळ भरून आले व जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतमालक हरीसिंह सोरते वय 52 वर्ष, (राहणार शीतल वाडी रामटेक) दिलीप मंगल लांजेवार वय 45 वर्ष (राहणार डोंगरी), ट्रॅक्टर मालक योगेश अशोक कोकण वय 30वर्ष,( राहणार चोरखुमारी) तसेच शेजारी शेतात गुरे राखत असलेले गुराखी मधुकर सावजी पंधराम वय 65 वर्ष, व त्यांच्यासोबत असलेला त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) नेहाल रामसिंग कुमरे वय 12 वर्ष (दोघेही राहनार चोरखुमारी) या पाचही जणांनी शेतातील झोपडीत सर्वांनी आसरा शोधला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते नेमका याच वेळी काळाने डाव साधला काळ्याकुट्ट आभाळात जोरदार वीज कडाडली झोपडीवर क्षणार्धात वीज पडली व यात योगेश अशोक कोकण,मधुकर सावजी पंधराम,दिलीप मंगल लांजेवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला काळाने डाव साधला होता. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या झोपडीतच असलेले हरीसिंह सोरते व नेहाल रामसिंग कुंभरे यांचे प्राण वाचले त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. उपचारार्थ त्यांना तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
उपरोक्त प्रकरणी पोलीस स्टेशन देवलापार येथे मर्ग दाखल करण्यात आला असून ठाणेदार प्रवीण बोरकुटे पुढील तपास करीत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज