*समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण महत्वाची भूमिका बजावतात – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश – आशुतोष करमरकर*
*विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन*
वर्धा – 14 ज्या नागरिकांची न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी आर्थिक स्थिती नसते अशा नागरिकांना वकील देऊन न्याय मिळवून देण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने केल्या जातो. प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठीच महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून न्यायाधीश श्री.करमरकर बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष महेंद्र ध्रुव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा यांची उपस्थिती होती.
समाजातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची जाणीव असणे गरजेचे आहे. समाजातील शेवटचा घटक आपल्या हक्कापासुन वंचित राहू नये यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्राम स्तरावर विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा एक भाग म्हणुन आज येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनेची माहिती तसेच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याच बरोबर कायद्याची सुध्दा माहिती दिली जाणार आहे, असे श्री करमरकर यांनी यावेळी सांगितले.
ज्यावेळी न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पक्षकार हतबल होतात त्याची आर्थिक स्थिती नसते अशावेळी विधी सेवा प्राधिकरण पक्षकारांना बाजु मांडण्यासाठी पुढे येऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात ही बाब सराहनीय आहे, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.
यावेळी प्रशांत होळकर, महेंद्र ध्रुव यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शासनाच्या विविध योजनेला लाभ देण्यात आलेल्या नागरिकांना लाभ प्रमाणपत्र देण्यात आले.
महाशिबिर व महामेळाव्याच्या दुस-या सत्रात समाज कल्याण, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, आरोग्य, संजय गांधी निराधार योजना, कृषी विभागाच्या योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिका-यांनी नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत परमा यांनी तर आभार अंजली व्यास यांनी मानले कार्यक्रमाला संबधित विभागाचे अधिकारी, न्यायाधिश, अधिकारी, कमर्चारी व लाभार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. महाशिबीरात वेगवेगळ्या विभागांचे स्टॅाल लावण्यात आले होते. नागरीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.