*महिलांनी मानसिकतेत बदल घडवून कृषीउद्योगात सहभागी व्हावे –विमला आर.*
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कृषी उद्योगविषयक कार्यशाळा*
नागपूर : 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कृषी विषयक कार्यशाळेत महिला बचत गटाचे सदस्य आलेले आहेत. महिलांची साथ राहिली तर कोणतेही काम अशक्य नाही. सहकार्य व संघटितपणे कोणतेही काम सुकर होते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्यांचा आदर्श मनी बाळगून जिल्ह्यातील शेतकरी महिला गटासह माविम, आत्मा बचत गट व महिला शेतकरी उत्पादक कृषीविषयक उद्योग क्षेत्रात सक्रीय सहभाग घ्यावा. महिलांनी स्वत:च्या मानसिकतेत बदल घडवून विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेंतर्गत कृषी उद्योगविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात करण्यात आले होते, या कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, कृषीसंवर्धन विभागाच्या उपसंचालक मनिषा कुंडलीक बँकेचे एडीएम श्री. देशमुख व गेडाम तसेच विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून महिलांनी काम करावे. त्याचबरोबर शेतकरी महिला उद्योजकांना पुरुषांनी सुध्दा सहकार्य करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील होतकरु महिलांना कृषीउद्योगाच्या प्रवाहात आणावे. बचत गटामुळे सावरण्याची क्षमता निर्माण होते. शेतकरी उद्योजक वैशाली चव्हाण यांनी फूड प्रोसेसिंग युनीटच्या माध्यमातून हे दाखवून दिले आहे. या कृषी उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस मदत होते, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या कार्यशाळेत आलेल्या महिला बचत गटाचे सदस्य, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींना बँकेच्या व्यवहाराबाबत तसेच येणाऱ्या अडचणीबाबत माहिती देण्यात यावी. यासोबत कृषी उद्योग व योजनांबाबत परिपूर्ण माहिती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कार्यशाळेच्या रुपाने कृषी क्षेत्रात परिवर्तन व जागृती निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करुन प्रशासन आपल्या सदैव पाठिशी आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगाच्या माहिती प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी दिली. कोटीपर्यंतचे उद्योगाचा या योजनेत समावेश होते. कृषी उत्पादनाचे अन्नात रुपांतर तसेच एका स्वरुपाचे इतर स्वरुपात रुपांतर आदी उद्योग यामध्ये येतात. राज्यात असंघटित व अनोंदणीकृत असे 2 लाख 24 हजार उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करण्यास मदत होणार आहे. या उद्योगाचे सोशल मिडियाद्वारे प्रसिध्दी करण्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या उद्योगाचा बँड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. त्यासह पेटंट निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रारंभी सादरीकरण कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कृषी विभागाने एक रुपया भाडयाने कृषी उद्योग साहित्य मिळवून दिली. त्याबरोबरच अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आज फुड प्रोसेसिंग युनीट स्थापन करण्यात आले आहे. शासनाचे मोठे सहकार्य मला मिळाले त्यामुळेच मी शेतकरी ते उद्योजक हा टप्पा गाठू शकली असल्याची भावना मोदा तालुक्यातील मारोडी येथील प्रगतीशिल कृषीउद्योजक वैशाली चव्हाण यांनी व्यक्त केली.
त्यांचा व हरित क्रांती महिला बचत गटांच्या सदस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेस माविम, महारेशीम अभियान, महिला बचत गट, शेतकरी महिला, शेतकरी उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.