*रब्बी हंगामात पिकाखालील क्षेत्र वाढवा – पालकमंत्री सुनील केदार
*रब्बी हंगामाचा पालकमंत्र्यांकडून आढावा*
वर्धा : यावर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणात पाणी साठा उपलब्ध आहे. रब्बी व उन्हाळी हंगामात हे पाणी शेतीपिकाला उपयुक्त ठरु शकते त्यामुळे रब्बीसह उन्हाळी हंगामातील पिकाखालील क्षेत्र वाढविण्याचे नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री यांनी रब्बी हंगामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार रणजित कांबळे, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पांमध्ये पाणी असल्याने त्याचा वापर शेतक-यांसाठी झाला पाहिजे. त्यामुळे येत्या हंगामात पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करा. भूईमुंग पिकाचे क्षेत्र प्राधान्याने वाढविण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी सोडतांना पाटबंधारे विभागाने कृषी विभागांशी समन्वय सांधून पाणी सोडावे. यासाठी दोनही विभागांनी संयुक्तपणे आठवडयातून किमान एकदा बैठक घ्यावी.
महाबिजने पुरविलेले सोयाबिनचे बियाणे उगवले नसल्याच्या अनेक शेतक-यांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करावा. मागील वर्षी रब्बी हंगामासाठी केलेले नियोजन व झालेले पिक निहाय साध्य याचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी खरीप हंगामासाठी उपलब्ध बियाणे, खते, कृषी निविष्ठा, उपलब्ध पाणी व त्याचे नियोजन, पिककर्ज वाटप, कोल्हापूरी बंधा-यांची दुरुस्ती, वीज जोडण्या, धडक सिंचन आदींचाही आढावा घेतला.
वर्धा शहरालगतच्या पिपरी मेघे व इतर 13 ग्राम पंचायती करीता सुरु असलेली पाणी पुरवठा योजना व पाईपलाईनचे काम, कोविड लसीकरण व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचे बांधकाम, झडशी तालुका सेलू येथील शासकीय जमीनीची अनधिकृत विक्री, सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत बांधन्यात आलेले चरखाभवन व इतर वास्तूंची देखभाल दुरुस्ती, वर्धा व लगतच्या ग्राम पंचायत क्षेत्रातील अनधिकृत ले आऊट आदी बाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज