*ज्येष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक वस्तूचे राष्ट्रीय वयोश्री योजनेतून लवकरच वाटप*
*व्हील चेअर, श्रवणयंत्र, चश्मा, वाकींग स्टीक आदी वस्तूंचे वाटप होणार*
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील गरजू, वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना मदत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून मोफत व्हील चेअर, श्रवणयंत्र, चश्मा, वाकींग स्टीक आदी वस्तूंचे वाटप होणार आहे. केंद्र शासनाच्या या योजनेची आज जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. या संदर्भात कधी व कोणत्या ठिकाणी शहरात व ग्रामीण भागात मेळावे आयोजित केले जातील, याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास तथा दिव्यांग सशक्तिकरण केंद्र नागपूरच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या कौशल विकास विभागा सोबतच राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणा,समाज कल्याण विभाग, महानगर पालिका प्रशासन व अन्य विभागाच्या सहभागात नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण ज्येष्ठ दिव्यांग गरजू व्यक्तींना या योजनेतून मदत केली जाणार आहे.
यासाठी मेळाव्याचे आयोजन केले जाईल. तत्पूर्वी नागरिक सेवा केंद्रातून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. यासाठी आवश्यक असणारी लिंक लवकरच संबंधित विभाग जाहीर करणार आहे. फॉर्म भरणे सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आपला आधार कार्ड, मोबाईल नंबर आवश्यक आहे.नागरिकांनी सुविधा केंद्रामध्ये केलेल्या अर्जावर त्यांना टोकन क्रमांक दिला जाणार आहे तसेच या अर्जामध्ये दाखल असलेल्या माहितीवरून कोणत्या वस्तू उपलब्ध करायच्या याची निश्चिती केली जाईल.त्यानंतर मोबाईल नंबरवर संपर्क साधला जाईल.
शिबिराच्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणार आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्याला देण्यापूर्वी अपंगत्व, डोळ्याचा नंबर, दिव्यांगत्व याबाबतची तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी या संदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. महानगर पालिका प्रशासनाच्या विविध झोनमधून यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. नागपूर महानगर व जिल्ह्यातील गरीब गरजू असाह्य दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना व्हील चेअर, श्रवण यंत्र, चष्मा,कुत्रीम अवयव,ट्राईपॉडस, चालण्यासाठी काठी, आदी वस्तूंची आवश्यकता आहे. त्यांनी लिंक जाहीर झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.