*मास्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या ब्राऊन कोब्रा (नाग) सापाला दिले जीवनदान*

*वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन यांचे यशस्वी प्रयत्न*
रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – पासून 5 कि.मी.अंतरावर असलेल्या चारगाव येथे आज दि.20/4/2022 सकाळी पहाटेला 5.30 वाजता अंगणामध्ये झाडू मारत असतांना एका टेबल खाली मांसाच्या जाळ्यामध्ये अडकलेला एक मोठा साप दिसून आला. साप दिसताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.नंतर मनोहर हटवार, राकेश साखरे, योगेश हर्षल साकरे यांनी त्वरित घटनेची माहिती वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्पमित्र,प्राणीमित्र अजय मेहरकुळे यांना दिली.

त्यांनी कोणताही वेळ न घालवता तात्काळ सर्पमित्र सागर धावडे यांना घेऊन चारगाव येथील घटनास्थळावर पोहोचले.सापाला पाहण्यास जमलेली लोकांची गर्दी बाजूला करण्यात आली.व त्या सापाच्या रेस्क्यू करण्यास सुरुवात केली. साप पूर्णपणे मासाच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता. सापाला जाळ्यासाहित बाहेर काढून त्या जाळ्यांचे एक-एक धागे कापुन त्या सापाला कोणतीही इजा न होता सलग एका तासाने त्या सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सापाला एका प्लास्टिकच्या भरणी मध्ये बंद करून गावातील लोकांना स्वच्छतेची माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागामधे लोकांनी आपापल्या घराच्या अंगणामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी असे सांगितले व पकडलेल्या सापाचा पंचनामा करून रामटेकचे वन रक्षक जाधव सर यांच्या समक्ष तो साप जंगलात सोडण्यात आला.
Maharashtra News Media सच की आवाज