Breaking News

*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन*

*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी अहेरी येथील सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत्‍ महिला बचत गटांनी एकत्र येत हा प्रकल्प सुरु केला आहे. महिला आता स्वबळावर उद्योग करु लागल्या असून, विस्कळीत झालेली संसाराची घडी सावरत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. महिलांनी परिश्रम करुन आत्मनिर्भर झाले पाहिजे, असे आवाहन श्री.कोश्यारी यांनी केले. उडान सोलर एनर्जी प्रकल्प हा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहू नये. या प्रकल्पातून जास्तीत जास्त सोलर पॅनल निर्मिती करण्यासाठी मेहनत घेऊन त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, असे राज्यपाल म्हणाले. या कार्यक्रमानंतर त्यांनी अहेरी येथील एकलव्य निवासी विद्यालयाला भेट दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यांना राज्यपालांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

तुमच्या जीवनातील अविस्मरणीय आठवणी कोणत्या? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला, त्यावर राज्यपालांनी आपल्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय होईल असे काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विपरित परिस्थितीत आपण शिक्षण पूर्ण केल्याचे सांगून त्यांनी यश मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तुमचे उत्तराखंड आणि गडचिरोली यात काय फरक दिसतो? या एका विद्यार्थिनीच्या प्रश्नावर आपल्याला कुठेही गेलो तरी भारत दिसतो, असे राज्यपाल म्हणाले. हिमालय असो की गडचिरोली, जिथे भारत माता की जय ऐकायला मिळते तिथे मला आपल्या घरातील लोक दिसतात असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे राज्यपालांनी अवलोकन केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून त्यांना प्रत्येक प्रयोगाची माहिती दिल्यानंतर त्यांचे राज्यपालांनी कौतुक केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ राहुल गुप्ता, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दुपारी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करुन रुग्णांशीही संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी त्यांना रुग्णालयाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपचंद सोयाम उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी नियोजन भवनात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन केले. मात्र, पत्रकार व काही लोकप्रतिनिधींना बैठकीत बसू न दिल्याने नाराजीचा सूर उमटला.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …