अहो,कसला विकास आणि कसलं काय! निव्वळ गप्पांचा बाजार.
(पाचवर्ष आश्वासनाची खैरात/भाजपा प्रती गडचांदूरात नाराजीचा सूर.)
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ९ जानेवारी रोजी मतदान आणि १० तारखेला लगेच दुसर्या दिवशी निकाल जाहीर होणार आहे.एकुण सतरा सदस्य असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरीपा.शेतकरी संघटना- शिवसेना-गोंडवाना गणतंत्र पार्टी-संभाजी ब्रिगेड तसेच वंचित बहुजन आघाडी-गोंडवाना संग्राम परिषद-भारिप बहुजन महासंघ हे पक्ष युतीत तर एकटी भाजपा निवडणुकीचा किल्ला लढवत आहे.जवळपास सगळ्याच पक्षाला बंडखोरीची लागण लागल्याचे दिसत असून पक्षासाठी काम करणाऱ्यांना तिकीट न मिळाल्याने कित्येकांनी चक्क बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. असूद्या परंतु शहराच्या विकासाबद्दल बोलायचे झाले तर भाजपचे अँड.संजय धोटे आमदार असताना गडचांदूर शहराच्या विकासा संबंधी अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु उल्लेखनीय कामे काही झालेली नाही.त्यावेळी गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजपची सत्ता होती.केंद्र व राज्य असे दोन मंत्री चंद्रपूर जिल्ह्याला लाभले होते.याकाळात ठिकठिकाणी करोडोंची विकास कामे होताना दिसत होती मात्र गडचांदूर शहराचा विकास काही झालेला नाही.माजी आमदार अँड.धोटेंनी गडचांदूर शहरात उल्लेखनीय असे काहीच कामे केलेले नाही.आणि ज्याप्रकारे आजघडीला आश्वासने देण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यावेळीही देऊन मते पदरात पाडुन घेण्यात आली.आजतागायत गडचांदूरला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही,गार्डन बनले नाही,नागरिकांना फिल्टरचे शुद्ध व निर्मळ पाणी मिळाले नाही,सुसज्ज बसस्थानक बनले नाही,नागरिकांना डोकेदुखी ठरवलेल्या मुख्य मार्गाच्या डिवायडरवर सुशोभित लाईट्स लावण्यात आले नाही,ग्रामीण रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टर नाही,एक्सरे मशीन,औषधी व इतर सोयीसुविधा नसल्याने लहानसहान गोष्टींसाठी रुग्णांना “रेफर-टु चंद्रपूर” अशी चिठ्ठी हातात दिली जाते.शहरातील तरूण बेरोजगारी,सिमेंट कंपनीकडून सतत होणारा प्रदुषण,ही सर्व कामे भाजपची एकहाती सत्ता असताना भय्या,भाऊ आणि माजी आमदाराने केलेली नाही तर आज घडीला राज्यात सत्ता नसताना करणार का ? अशी हास्यास्पद चर्चा निवडणुकीच्या तोंडावर शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. शहराच्या काही भागात रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याने पुन्हा त्याच रस्त्याला बनवून जनतेच्या पैशांना चूना लावण्यात आला.दरवर्षी लाखोंच्या खर्चाने शहरात हजारोंच्या संख्येत वृक्षलागवड केली जाते आता त्यातील जगले किती आणि मेले किती हे मात्र कोडेच बनले आहे. विशेष म्हणजे अनेक कंत्राटदार असताना नगरपरिषद प्रत्येकदा केवळ एकाच कंत्राटदाराला कामे कसेकाय देतात याविषयी अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन “अहो,कसला विकास आणि कसलं काय,निव्वळ गप्पांचा बाजार” अशी जळजळीत भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.आश्वासनानंतर ही गेल्या पाचवर्षात गडचांदूरातील समस्या मार्गी लावण्यात जे नेते अपयशी ठरले त्यांना गडचांदूरकर पुन्हा संधी देणारा का! हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.