*मजुरी व रॉयल्टी बुडविणाऱ्या कंत्राटदारांना तेंदूचे कंत्राट देऊ नकाः गाव गणराज्य ग्रामसभा परिषद*
गड़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकूडकर
गडचिरोली: पेसा व वनहक्क कायद्यानुसार तेंदू व बांबूचे विक्री व्यवस्थापन करताना ग्रामसभांनी निविदा प्रक्रिया करून नेमलेल्या कंत्राटदारांनी अनेक ग्रामसभांच्या मजुरांची मजुरी व रॉयल्टी देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार मागील तीन वर्षांपासून होत आहे. यामुळे ग्रामसभासदांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने चालू हंगामात अशा बुडव्या कंत्राटदारांना जिल्हाभरातील ग्रामसभांनी तेंदूपत्ता व बांबूचे कंत्राट देऊ नयेत, असे आवाहन जिल्हास्तरीय गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेच्या अध्यक्ष जयश्री वेळदा यांनी ग्रामसभांना केले आहे.
जिल्हास्तरीय गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेच्या वतीने जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की,२०१७ च्या हंगामात एटापल्ली, भामरागड,अहेरी, सिरोंचा तालुक्यातील ग्रामसभांचे महसूल तेंदूपत्ता कंत्राटदारांनी आजपर्यंत पूर्णपणे दिलेले नाही. असे असताना हेच कंत्राटदार नाव बदलून दुसऱ्या तालुक्यातील ग्रामसभांचे कंत्राट २०१८ व २०१९ मध्ये घेऊन पुन्हा मजुरी व रॉयल्टी देण्यास कुचराई करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालू हंगामात तेंदूपत्ता आणि बांबूच्या कंत्राटाचे करारनामे करताना कंत्राटदारांच्या व्यवहाराची खात्री करुनच तोडाईचे काम द्यावे; अन्यथा जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामसभेची फसवणूक केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही क्षणी करारनामा रद्द करून दुसरा कंत्राटदार नेमावा. तसेच, मागील हंगामामधील मजुरी व रायल्टी अजूनही देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारांविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ठराव मंजूर करावे व संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकल्याचे इतर ग्रामसभांना कळवावे.
*जिल्हा प्रशासना वर केले आरोप*
याशिवाय जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसभांच्या कायदेशीर हक्कांवर गदा आणून निविदा प्रक्रियेबाबत शासकीय पध्दती वापरण्यास बळजबरी करण्याचाही प्रयत्न केल्या जात आहे,मात्र ग्रामसभांचे व्यवहार अडचणीत आल्यावर प्रशासनाकडून हात झटकले जात असल्याने ग्रामसभांनी सर्वस्वी स्वतःच्या निर्णयानुसारच निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही जयश्री वेळदा यांनी केले आहे.