कोरोना व लॉक डाऊनमुळे फुलाची शेती धोक्यात…

फुल शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ…

*लाखोचे नुकसान, शासनाने घ्यावी दखल*
*विशेष प्रतिनिधी विनोद वासाडे सोबत सुरज सेलकर/दिनेश चौरसीया*
सावनेर- कोरोनामुळे फुलाचे सर्वच मार्केट बंद असल्यामुळे आणि मागणीच नसल्याने नागपूर जिल्ह्यात फुलशेतीला कोट्यवधींचा फटका बसला आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
फुलांची विक्री होत नसल्याने तोडणीला आलेली फुले शेताबाहेर फेकावी लागत आहेत. या आपत्तीने फूल उत्पादक खचले असून बँकेच्या कर्जाची चिंता सतावत आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी फुल उत्पादक शेतकरी मागणी आहे.
जिल्ह्यात ७० ते ८० पेक्षा जास्त पॉलिहाऊस धारक शेतकरी आहे आणि १००० च्या आसपास छोटे फूल उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्याकडून फुलाचे उत्पन्न सीताबर्डी, नेताजी मार्केटमधील महात्मा फुले पुष्प उत्पादक बाजारात फुलांची विक्री करण्यात येते.त्या फुल बाजारात ६० लहान मोठे व्यापारी असून त्यांच्याकडे दररोज ५० ते ६० टन विविध प्रकारचे फुल येतात.त्यातून शेतकरी व व्यापारी यांच्यात दररोज ४० ते ५० लाखांचा व्यवहार होतो.पण कोरोनामुळे २० मार्चपासून मार्केट बंद आहे. त्यामुळे उत्पादकांकडून आवकच बंद झाली आहे. सजावटीची फुले पॉलीहाऊस आणि पूजेची फुले शेतातच आहेत. झाडे खराब होऊ नये म्हणून दररोज फुले तोडून फेकून द्यावी लागत आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नसमारंभ आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. फुलांची सर्वाधिक विक्री याच महिन्यात होते. पण विक्रीच बंद असल्याने दररोज झाडांना येणाऱ्या फुलांचे काय करायचे, असा प्रश्न फुल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शासनाच्या निर्देशानुसार तीन महिने बँकांचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत. पण त्यानंतर बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी घरी येतीलच, नोटिश देतील. सततच्या तोट्यामुळे त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

देशी गुलाब,नवरंग,शेवंती व विविध फुलांचे नागपूर जिल्ह्यातील ता. सावनेर, मौजा.पाटणसावंगी येथील शेतकरी प्रदीप सातपुते यांच्यानुसार, ७ एकरात विविध फुलांचे उत्पादन १९९१ पासून घेण्यात येत आहे. ३० वर्षांच्या काळात असे गंभीर संकट पहिल्यांदाच पाहत आहे. २० मार्चपासून महात्मा फुले पुष्प उत्पादक बाजार बंद आहे. बाजाराबाहेर फुलांना कुणीही खरेदीदार नाही. फुले जास्त दिवस टिकत नाहीत. त्यांच्या शेतात सध्या देशी गुलाबाचे उत्पन्न तयार असून दररोज फुलांची तोडणी करावी लागते. फुलांची विक्रीच होत नसल्याने दररोज ३०० किलो देशी गुलाबाची फुले फेकून द्यावी लागत आहेत. पंधरा दिवसात पाच लाखाचा तोटा झाला आहे. पुढे स्थिती अशीच राहिल्यास दररोज तोटा वाढणार आहे. झाडांची जोपासना करण्यासाठी फुलांना फेकावे लागत आहे. अर्थात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.सातपुते यांचा परिवार फुल शेतीवर अवलंबून असून त्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट आहे. कोरोनाचा नायनाट होऊन व्यवसाय सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षा आहे.

सावनेर तालुक्यातील जलालखेडा येथील फुल शेतकरी दिनेश मांडोकर यांच्या म्हणण्यानुसार, पॉलीहाऊसमधून डच गुलाब सजावटीच्या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. सध्या कार्यक्रमाचे सीझन आहे. पण कोरोनामुळे २० मार्चपासून फुलबाजार बंद असल्याने विक्री ठप्प झाली आहे. पॉलीहाऊसमध्ये फुलांचे दररोज उत्पादन तयार होते. पण विक्री बंद असल्याने व फुल झाडं बेकार होऊ नये म्हणून फुल तोडून फेकून द्यावी लागत आहे. दररोज ४०००० रुपयांची फुले फेकावी लागत आहे. फुले न तोडल्यास झाडे खराब होण्याची भीती असते. खत आणि मजुरांचा दररोजचा खर्च सुरूच आहे. एक एकरातील पॉलीहाऊसमध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये प्लॅन्टेशन केले. ५० लाखांचा प्रकल्प आहे. तीन महिन्यात ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यावर्षी लग्नसमारंभही नसल्याने ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान होणार असून यंदा कोरोनामुळे गंभीर संकट आले आहे.

बाजारातील कर्मचाऱ्यांचीही उपासमार….
नेताजी मार्केटमधून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात फुलांची खरेदी विक्री होते. बाजारात ६० व्यापारी असून प्रत्येकाकडे तीन ते चार कर्मचारी काम करतात. हे कर्मचारी नोंदणीकृत नाहीत. त्यांच्याकडे काम नाही. त्यांची आवक बंद झाली असून त्यांची उपासमार होत आहे. प्रारंभी व्यापाऱ्यांनी त्यांना आर्थिक मदत केली. पण व्यवसाय बंद असल्याने वारंवार मदत करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी चंदू फ्लॉवर चे मालक नरेंद्र मिरे यांनी केली आहे.

Maharashtra News Media सच की आवाज