*बनावट ई-पास बनविणाऱ्या दोघांवर देसाईगंज ठाण्यात गुन्हा दाखल*
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी- सुरज कुकडकर
गडचिरोली: कोरोना विषाणू साथरोगाच्या अनुषंगाने दुसऱ्या जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी बनावट ई-पास तयार करणाऱ्या दोघांवर देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश दुर्योधन राऊत(३१)रा. जुनी वडसा व संतोष बकाराम कोरे(४४)रा.हनुमान वॉर्ड देसाईगंज अशी आरोपींची नावे आहेत.
सध्या जगभर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी जाहीर करुन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी जायचे झाल्यास सर्व बाबींची पडताळणी करुन संबंधित व्यक्तीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ई-पास दिला जातो. कुणीही विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करु नये, यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. देसाईगंज येथेही ब्रम्हपुरी मार्ग, लाखांदूर मार्गावरील सावंगी येथे व अर्जुनी मार्गावर वनविभागाच्या नाक्यावर नाकेबंदी करण्यात आली आहे. आज देसाईगंज पोलिस ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाजवळ नाकेबंदी करीत असताना जुनी वडसा येथील मुकेश राऊत हा एम.एच.३३ एल ४२१० क्रमांकाच्या मोटारसायकलने ब्रम्हपुरीला जात होता. पोलिसांनी त्यास थांबवून विचारणा केली असता त्याने त्याच्याकडील ई-पास दाखविला. मात्र, पोलिसांना शंका आल्याने त्यांनी संबंधित मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता तो ई-पास बनावट असल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता त्याने ई-पास संतोष कोरे यांच्या देसाईगंज येथील व्हीजन कॉम्प्युटरमध्ये तयार केल्याचे कबूल केले. यावरुन पोलिसांनी मुकेश राऊत व संतोष कोरे या
दोघांवर भादंवि कलम ४१९,४६५,४६८,४७१,३४,१८८ सह ६६(सी), ६६(डी)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra News Media सच की आवाज