*60 वर्षावरील वृद्धांना अकारण बाहेर पडण्यास मज्जाव करा: –श्री.संजीव कुमार*
गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली: ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना कोरोना संसर्गापासून जास्त धोका आहे. त्यामुळे त्या वयोगटावर लक्ष केंद्रीत करून त्यांना अकारण बाहेर पडू देण्यास मज्जाव करा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.संजीवकुमार यांनी दिले.
विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाबाबतच्या जिल्हास्तरीय तयारीचा आढावा घेतला, यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना कोरोना संसर्गापासून जास्त धोका आहे. त्यामुळे त्या वयोगटावर लक्ष केंद्रीत करून त्यांना अकारण बाहेर पडू देण्यास मज्जाव करा, अशी सूचना श्री.संजीवकुमार यांनी यावेळी दिली. मधुमेह व उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनाही आवश्यक सूचना करण्यास त्यांनी सांगितले. महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणेच्या कामकाजाबाबत विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक गावात विविध आरोग्यविषयक लक्षणे आढळणाऱ्या, तसेच नव्याने येणाऱ्या लोकांची माहिती घेण्याबाबत यंत्रणा तयार करा, दर दिवशी प्रत्येक ठिकाणाहून माहिती वेळेत संकलित होईल, याकडे लक्ष द्या, असेही त्यांनी सांगितले. पुढील तीन ते चार महिन्यानंतरच्या स्थितीचा अंदाज घेऊन नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
*मान्सूनपूर्व तयारीचाही आढावा*
या बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सूनपूर्व तयारीचाही आढावा घेतला. आवश्यक अन्नधान्य पुरवठा, आरोग्य विषयक साहित्य, बोटींची व्यवस्था तसेच आवश्यक मनुष्यबळ यावर त्यांनी चर्चा केली. पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांच्या संख्येत घट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हयातील तयारी बाबत सादरीकरण दिले, तर पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या विभागांची माहिती त्यांना सादर केली.
*३६ कोरोना योद्ध्यांचा सन्मान*
कोरोना विषाणूसंदर्भातील आरोग्यविषयक परिस्थिती हाताळणारे आरोग्य विभागातील ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आज विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी ते गावस्तरावर काम करणाऱ्या काही निवडक कोरोना योद्ध्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ.पंकज हेमके, डॉ.नरेंद्र कुंभारे यांच्यासह इतर कोरोना योद्ध्यांचा त्यात समावेश होता. गडचिरोली जिल्हयातील कोरोनाबाबत केलेल्या कामाच्या अनुषंगाने त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. जिल्हयातील प्रत्येक आरोग्य कर्मचारी आज कोरोना योद्ध्यांच्या भूमिकेत कार्यरत आहे. त्या सर्वांचे योगदान मोठया प्रमाणात आहे. त्यातील काही निवडक लोकांनाच आज सन्मानित केल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले. यावेळी अतिरीक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता, मनोज जिंदाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे,जिल्हा माहिती अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ.विनोद मशाखेत्री यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज