*धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष द्या*
-विधानसभा अध्यक्ष नाना पटोले*
*विशेष प्रतिनिधी भंडारा*
*भंडारा:-* पावसाळी परिस्थितीमुळे धान खरेदी केंद्रावरील धानाची स्थिती अतिशय गंभीर आहे. उघडयावर पडलेला धान पावसामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यासाठी दोन दिवसात याचा निपटारा झाला पाहीजे. मिलर्सच्या सोयीने धानाची भरडाई केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. मिलर्सच्या मिलमध्ये धान साठवणूक करुन शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष दया, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी, विविध कार्यकारी सहकारी संस्था पोहरा, विविध कार्यकारी सहकारी संस्था पिंपळगाव, साईबाबा राईस मिल पळसगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती सानगडी येथे धानाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी विधानसभा अध्यक्षांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पणन अधिकारी थोरात, तहसिलदार बाळासाहेब टेळे, मलिक विराणी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे लवकरात लवकर करण्यासाठी टोकन पध्दतीचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी पिंपळगाव पॅर्टनचा उपयोग करा असे सांगून श्री. पटोले यांनी धान खरेदी करतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी साध्या काटयावर धान खरेदी होत असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे असे ते म्हणाले. खरेदी केंद्रानी इलेक्ट्रानिक्स काटयावरच धान मोजणी करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या. यासाठी योग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करावा. लवकरच मुंबई येथे सचिव स्तरीय बैठक घेवून याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बऱ्याच धान खरेदी केंद्राच्या इमारतीची अवस्था दयनिय आहे. तसेच धान साठवणूकीसाठी गोदामाची आवश्यकता असल्याने नवीन इमारती प्रस्तावित करा. पिंपळगाव धान खरेदी केंद्रात योग्य प्रणालीचा वापर करुन धान खरेदी होत आहे. त्याच अधारावर अन्य ठिकाणी धान खरेदी करावी असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. मोजणीच्या वेळी धान कमी भरत असेल तर ग्रेडरवर दंड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या दोन दिवसात संपूर्ण धान खरेदी झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी या दौऱ्यात दिले. धानाच्या साठवण क्षमतेत वाढ कशी करता येईल याकडे प्राथम्याने लक्ष देवून मिलर्सनी लवकरात लवकर धान भरडाई करण्याची तंबी त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी टोकन देवून धान खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गोदाम लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
*साकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ*
साकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, कृषी सेवा केंद्र असोशिएशनचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर उपस्थित होते. यावेळी त्रिवेणी शेतकरी बचत गट वडद, आदर्श शेतकरी बचत गट सावरबंध, बहुउद्देशिय जण बियाणे शेतकरी पुरुष गट उसगाव या बचतगटांना शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते व किटकनाशकांचे वितरण करण्यात आले…