*समाजकल्याण विभाग १ करोड ८८ लाख रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार*
*दोन वर्षांपासून आंतरजातीय विवाह योजनेचे लाभार्थी होते लाभापासून वंचित*
*ग्रामपंचायत सदस्य रोशन मेश्राम यांच्या प्रयत्नांना यश*
खात :- मागील दोन वर्षापासून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आंतरजातीय विवाह योजनेचे शेकडो लाभार्थी लाभापासून वंचित होते. या योजनेअंतर्गत प्रत्येक आंतरजातीय नवविवाहित जोडीला केंद्र सरकार कडून पंचवीस हजार आणि राज्य सरकार कडून पंचवीस हजार असे एकूण *पन्नास हजार* रुपयांचे अर्थसहाय्य केंद्र आणि राज्य सरकार कडून दिले जाते.
*“ जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गत वर्षात माहे मार्च २०२० मंध्ये केंद्र सरकारकडून ९४ लाख रुपये तरतूद प्राप्त करून देण्यात आली आहे.सदरहू तरतूद आहारीत करून राज्य सरकारचीही समप्रमाणात ९४ लाख रुपयांची तरतूद आहारीत करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ३७६ लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर निधी देने शक्य आहे. सदर बाबीवर विभागाने प्रथम प्राधान्याने कारवाई करणे सुरू केलेली आहे व ३७६ लाभार्थ्यांना समाजकल्याण विभागात सर्व ओरिजनल कागतपत्रे घेऊन कार्यालयात बोलावणे सुरु आहे. आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरळ पन्नास हजार रुपये जमा करण्याबाबत कार्यवाही करत आहे. ३७६ लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त प्रलंबित असलेल्या ६५० लाभार्थ्यांच्या प्रस्तावांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. पुरेशी तरतूद प्राप्त झाल्यावर दिनांकनिहाय प्राप्त अर्जाच्या प्रधान्यक्रमानुसार अर्ज निकाली काढण्यात येईल. कारण एकूण १०२६ आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे अर्ज आमच्या कार्यालयात आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत ”*
मौजा नेरला येथील नागरिक निखिल सुरेश शिंदे यांनी दिनांक २०/०४/२०१८ ला आंतरजातीय विवाह केला आहे परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद नागपूर येथील समाजकल्याण विभागात आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्याबाबत दिनांक ११/१०/२०१८ ला अर्ज दाखल केला होता.
परंतु जिल्हा परिषद नागपूर येथील समाजकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लापरवाहीमुळे मागील दोन वर्षांपासून या लाभार्थ्याला प्रोत्साहन अनुदान प्राप्त झालेले नव्हते. अर्जदार निखिल शिंदे यांनी जिल्हा परिषद नागपूर येथील समाजकल्याण विभागात मागील दोन वर्षात सात ते आठ वेळा याबाबत भेटी दिल्या परंतु समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तारीख वर तारीख दिल्यामुळे नेहमी प्रमाणे त्यांच्या पदरात निराशाच पडत असायची.
शेवटी त्रस्त झालेल्या निखिल शिंदे यांनी चाचेर सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते श्री. रोशन मेश्राम यांची भेट घेतली व त्यांना आपली संपूर्ण आपबिती सांगितली होती.
सामाजिक कार्यकर्ते श्री. रोशन मेश्राम यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ जिल्हा परिषद नागपूर येथील समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना भेट दिली व याबाबत समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना तोंडी माहिती विचारली होती.
माहिती विचारल्यावर सामाजिक कार्यकर्ते श्री. रोशन मेश्राम यांच्या असे लक्षात आले की, मे २०१८ पासून ते जून २०२० म्हणजेच आत्तापर्यंत अर्ज दाखल केलेल्या १०२६ लाभार्थ्यापैकी एकाही लाभार्थ्यांला समाजकल्याण विभागामार्फत या योजनेचे अनुदान मिळाले नाहीत. यामुळे नागपूर जिल्ह्यातील हजारोंच्या जवळपास लाभार्थ्यांना आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत मिळणारा प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाला नव्हता. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांनी त्वरित क्षणाचाही विलंब न लावता जिल्हा परिषद नागपूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (भा.प्र.से.) आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांची भेट घेतली होती व त्यांना याबाबत संपूर्ण माहिती निवेदनाच्या माध्यमातून दिली होती.
निवेदनात श्री. रोशन मेश्राम यांनी सांगितले होते की,
देशात जातीयवाद व भेदभाव पूर्णपणे नष्ट करण्याकरिता समाजकल्याण विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवीत आहेत.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने आंतरजातीय विवाह योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आणि जातीपातीचे भेदभाव नष्ट करने हे आहे. अस्पृश्यता निवारणार्थ आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजारांचे अर्थसाहाय्य प्रत्येक नवविवाहित जोडीला दिले जाते. भारतीय घटनेने जातीयता नष्ट केली आहे. जातीयता पाळणा-यास शिक्षा तसेच दंडाचीही तरतूद आहे. एकीकडे जातीयवाद्यांना कायद्याचा धाक आणि दुसरीकडे जातीच्या भिंती पाडणा-यांना प्रोत्साहन असे शासनाचे धोरण आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील अनेक आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितांना ज्यांनी आपल्या कार्यालयात आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज दाखल करून सुद्धा या योजनेचे अनुदान अजूनपर्यंत त्या लाभार्थ्यांना प्राप्त झालेले नाहीत. याविषयावर जिल्हा परिषद नागपूर येथील प्रशासनाने जातीने लक्ष देऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून आपल्या कार्यालयात अर्ज केलेल्या नागपूर जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना अतिशीघ्र आंतरजातीय विवाह योजनेचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी रोशन मेश्राम यांनी केली होती. अखेर सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले व नागपूर जिल्ह्यातील ३७६ लाभार्थ्यांना लाभ देणेबाबत समाजकल्याण विभागाने कार्यवाही करणे सुरू केली आहे.
प्रतिक्रिया :-
१) जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी ३७६ जोडप्यांना लाभ मिळवुन देणेबाबत सकारात्मक सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व उर्वरित ६५० लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत मी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पाठपुरावा करेल.
*- रोशन मेश्राम* सदस्य, ग्रामपंचायत नेरला
२) एक ग्रामपंचायत सदस्य काय करू शकतो हे सामाजिक कार्यकर्ते रोशन मेश्राम यांनी करून दाखवलंय. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या समस्या त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या. सत्ता नसतांनाही त्यांनी अधिकाऱ्यांना घाम फोडलाय. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
– निखिल शिंदे, आंतरजातीय विवाह योजना लाभार्थी