“धनी धुऱ्यावर,चोर माऱ्यावर” खोट्या स्वाक्षरीने प्लॉट विक्री.
(गडचांदूरातील काही व्हाईट कॉलर दलालांचा करिश्मा)
आवारपूर :-गौतम धोटे
औद्योगिक शहरांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असल्याने याठिकाणी बरेच कुटुंब किरायच्या घरात राहून दिवस आज काढत आहे.लहान का असेना पण स्वतःच्या मालकी हक्काचा निवारा असावा या आशेने कित्येक जण शहराच्या कानाकोपऱ्यातील प्लॉट खरेदी करताना दिसत आहे.जमीनी बद्दल कोणतीही शहानिशा न करता प्लॉट खरेदी करणार्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात असून येथील काही व्हाईट कॉलर दलालांनी शेत खरेदी करण्यासाठी एका शेत मालकासोबत ईसारपत्र केले मात्र आजतागायत रितसर खरेदी केलेली नाही.ईसारपत्राची मुदत ही संपली मात्र ह्या महाशयांनी खऱ्या मालकाला अंधारात ठेवून स्वताला मालक असल्याचे सांगून परस्पर प्लॉटची विक्री केल्याची आणि करीत असल्याची चर्चा सुरू आहे.सदर शेत मालक हल्ली चंद्रपूर येथे वास्तव्यास असून याविषयी तो अनभिज्ञ असावे असे बोलले जात आहे.याप्रकरणात विक्रीपत्रावर शेत मालकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या तर केल्या जात नाहीना अशाही शंकांना उधाण आले आहे.
तलाठी कार्यालयात माहिती घेतली असता शेत मालक वेगळेच आणि प्लॉट विकणारे वेगळेच असल्याचे दिसत असून भोळीभाबडी जनता यांच्यावर विश्वास ठेवून प्लॉट खरेदी करून घरे सुद्धा बांधत आहे.मुळातच ही जमीन यांची नसल्याने जनतेची फसवणूक होतांना दिसत आहे.लाखोंच्या प्लॉटांचे व्यवहार केवळ शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर होत असल्याने एकीकडे शासनाचा हजारोंच्या महसूलावर पाणी फिरत आहे तर दुसरीकडे नगरपरिषदेने स्टैंप पेपर वरील प्लॉट खरेदीचे फेरफार बंद केले आहे.यामुळे प्लॉट धारकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत असून आदिवासींच्या जमीनी कवडीमोल भावाने खरेदी करून त्यांच्याच स्वाक्षरीने प्लॉट विक्री करणारी टोळी कित्येक वर्षांपासून शहरात सक्रिय असून यातील दोन व्यक्तींनी अक्षरशः कहरच केल्याचे दिसून येत आहे.शेतीच्या ईसारपत्रराची मुदत संपल्यानंतरही खऱ्या मालकाला माहिती नसताना स्वत: मालक बनून खोट्या स्वाक्षरीने 2015 पासून ते आजपर्यंत प्लॉटची विक्री केल्याची खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे.सदर शेत मालकाकडून जर रितसर तक्रार दाखल झालीच तर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची आणि प्लॉट खरेदी करणारे विनाकारण गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पण आता शेतमालक याविषयी कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”धनी धुऱ्यावर,चोर बसले माऱ्यावर” शेवटी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.