*पाणी भरतांना नळाला करंट आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू*
*चन्कापूर वसाहत येथील घटना*
खापरखेडा प्रतिनिधी – दिलीप येवले
खापरखेडा:- खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चन्कापुर वसाहतीतील घटना इयत्या नववीची विद्यार्थिनीचा घराच्या छतावर पिण्याचे पाणी भरतांना नळाला आलेल्या करंटमुळे जागीच मृत्यू झाला. ही घटना चणकापूर पिपला कॉलनी वसाहतीत रविवारी (17 ऑक्टोंबर) पहाटेच्या सुमारास घडली या घटनेमुळे चणकापूर परिसर व शालेय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मृतक विद्यार्थिनीचे नाव पायल नंदू चौधरी वय 14 वर्ष आहे. ती वीजकेंद्राच्या प्रकाश नगर वसाहतीतील शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा येथे हिंदी माध्यम इयत्या नववीत शिकत होती. पायलला तीन बहिणी एक भाऊ आहे. घटनेच्या दिवशी पायल, आई सुनीता, भाऊ राहुल, तीन बहिणी सोबत झोपली होती. रोजच्या पिण्याच्या पाण्याचा त्रास होता. त्यामुळे मृतक पायलच्या आईने तिला पहाटे चार वाजता छतावर जाऊन पाणी भरण्यास सांगितले मात्र पाण्याच्या टाकीलगतच्या लोखंडी पाइपला करंट येत होता. याची कल्पना मृतक पायलला नव्हती. पाण्याची बकेट नळाला लावताच करंट लागून ती गतप्राण झाली. पायल घरात न आल्याचे पाहून आईने मुलाला छतावर जाऊन बघण्यास सांगितले. राहुलला पायल नळाला चिकटलेली दिसली त्याने आरडाओरडा केला पायलच्या मोठ्या बहिणीने धाव घेतली. दोन्ही बहिणभावाने पायला ओढून बाहेर काढले मात्र तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले़ सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.