ट्रैवेल्स व्यवसाय बागडी चा हायटेक सट्टापट्टी अड्ड्यावर छापा
प्रतिनिधी, नागपूर
स्नेहनगरमधील वरद कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या अज्जू बागडी याच्या हायटेक सट्टापट्टी अड्ड्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना अटक केली. या अड्ड्यावरून तब्बल तीन राज्यातून सट्ट्याची खायवडी करण्यात येत होती. अजय ऊर्फ अज्जू मंगलचंद बागडी व त्याचा साथीदार रामकुमार खेमका हे फरार असून, पोलिस दोघांचा कसून शोध घेत आहेत. सतीश सुधाकरराव बागडे (रा. सतरंजीपुरा), प्रकाश नारायण सापधरे (रा. फुटाळा झोपडपट्टी), मुकेश शिवनारायण पाठरे (रा. सावित्रीबाई फुलेनगर), राजेश तुकाराम डेकाटे (रा. पाचपावली), बबलू सुखदेव निमजे (रा. कळमना), आशुतोष दत्तात्रय चिल्लेदार (रा. प्रशांतनगर), शुभम विवेक मटके (रा. इतवारी) व वासुदेव नारायण हांडे (रा. सतरंजीपुरा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सुमारे तीन वर्षांनंतर अज्जू बागडी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
अजय बागडी याचा ट्रॅव्हल्स व हॉटेलचा व्यवसाय आहे. गत अनेक दिवसांपासून वरद कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन अज्जू याने हायटेक सट्ट्याची खायवडी सुरू केली. तीन राज्यातून तो सट्ट्याची खायवडी करायचा. या फ्लॅटला त्याने आयटी कंपनीसारखे सजविले होते. वरद कॉम्प्लेक्समध्ये अज्जू याचा सट्टापट्टी अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे व उपायुक्त गजानन राजमाने ,सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक रफीक खान, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र कारेमोरे, प्रशांत लांडे, अनूप शाहू, शैलेष पाटील, अरुण धर्मे, टप्पूलाल चुटे, सत्येंद्र यादव, शरीफ शेख व फिरोज खान यांनी छापा टाकून आठ जणांना अटक केली. पोलिसांनी लॅपटॉप, प्रिंटर, ३३ मोबाइल, वायफाय राउटरसह दीड लाखांचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अज्जू व त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.