Breaking News

*गडचिरोलीचे महिला व बाल रुग्णालयात कामात सरस; पण सुविधांचा अभाव*

*गडचिरोलीचे महिला व बाल रुग्णालयात कामात सरस; पण सुविधांचा अभाव*

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर

गडचिरोली: येथील महिला व बाल रुग्णालयाचे काम समाधानकारक असले; तरी वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि जागेचा अभाव यामुळे रुग्णांना दर्जेदार सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.

महिला व बाल रुग्णालय हे गडचिरोलीतील मुख्य चौकात आहे. या रुग्णालयात गडचिरोली जिल्ह्यासह शेजारच्या चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांतील व छत्तीसगड राज्यातील रुग्णही मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना उत्तम दर्जाची व वेळेवर सेवा देणे कठीण होऊ लागले आहे. सद्य:स्थितीत या रुग्णालयात 29 पदे मंजूर असून, वर्ग 3 ची 5 आणि वर्ग 4 ची 24 पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी काही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्रतिनियुक्तीवर येथे आणण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रसूती तज्ज्ञ 5, बालरोग तज्ज्ञ 4 व अनॉस्थेशिया तज्ज्ञ 4 असे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु वर्ग 1 च्या 5 डॉक्टरांपैकी 4 पदे रिक्त् आहेत.

विशेष म्हणजे, एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत या रुग्णालयात 3213 महिला प्रसूत झाल्या. त्यापैकी 1819 महिलांची प्रसूती सामान्य झाली, तर 1394 महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया (सिझर) करुन करण्यात आली. सामान्य प्रसूतीचे प्रमाण 57 टक्के, तर सिझेरियनचे प्रमाण 43 टक्के आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे, बाल मृत्यूचा दर 5.76% टक्के एवढा आहे. मागील काही महिन्यात या रुग्णालयात 81 बालकांचा मृत्यू झाला आहे. वजन कमी असल्याने, फुफ्फुसाचा आजार व अन्य कारणांमुळे बालमृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुळातच या रुग्णालयाची इमारत ही रुग्णालयाच्या दृ्ष्टीने अनुकूल अशी बांधण्यात आलेली नाही. सरळ सरळ मोठे हॉल तयार करण्यात आले. त्यामुळे हॉलमध्ये कप्पे तयार करुन डॉक्टर्स व परिचारिका यांचे कक्ष तयार करावे लागले. परंतु तेथे शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही. ही बाब लक्षात येताच प्रशासनाने नवीन बांधकाम सुरु केले. त्यामुळे शासनावर कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. आधीच इमारतीचे बांधकाम व्यवस्थित केले असते तर शासनावर आर्थिक भुर्दंड बसला नसता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज(ता.18/12/2019) जिल्हा दौऱ्यावर येत असून, ते महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त या रुग्णालयाला चांगले दिवस यावेत, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …