Breaking News

*चोरबाहुली शिवारात २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; दोन आरोपी अटकेत!* *सावनेरहून गावी सोडण्याच्या बहाण्याने नेले; महामार्गालगत मृतदेह फेकल्याचा आरोप*

*चोरबाहुली शिवारात २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; दोन आरोपी अटकेत!*

*सावनेरहून गावी सोडण्याच्या बहाण्याने नेले; महामार्गालगत मृतदेह फेकल्याचा आरोप*

नागपूर –  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावनेरहून मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणाऱ्या २३ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरबाहुली शिवारात हा मृतदेह आढळून आला असून, या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शिवकुमार सोनेश्वर असे मृत तरुणाचे नाव असून सावनेरहून गावी सोडून देण्याच्या बहाण्याने सोबत नेले आणि वाटेतच तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिवकुमार अनिलकुमार सोनेश्वर, वय २३, हा मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पारसवानी येथील रहिवासी होता. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याने अन्य दोन व्यक्तींसोबत मोटारसायकलवरून प्रवास करत असल्याचे छायाचित्र आपल्या कुटुंबीयांना पाठविले होते. मात्र, तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ जयकुमार सोनेश्वर याने ११ ऑक्टोबर रोजी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत छायाचित्रातील व्यक्तींची चौकशी केली. या तपासादरम्यान आकाश गुणवंता धुर्वे, वय २८, आणि विलास मधुकर इनवाते, वय २८, दोघेही रा. कोथुळणा, ता. सावनेर, जि. नागपूर, यांची नावे समोर आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवकुमारला गावी सोडण्याचे सांगून तिघेही सावनेरहून मनसरमार्गे सिवनीच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान रात्री दहाच्या ते अकराच्या सुमारास रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर शिवकुमार आणि दोन्ही आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांनी त्याला मारहाण करून डोक्यावर दगड मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत फेकून आरोपी निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे १२ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आरोपींना सोबत घेऊन चोरबाहुली शिवारातील घटनास्थळी तपास केला. यावेळी मृतदेह आढळून आला. शिवकुमारचा भाऊ जयकुमार याने मृतदेहाची ओळख पटविली. घटनास्थळ देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.

या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्यांचा रिमांड घेण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलीस करीत आहेत.

Check Also

*समर्पण आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचा सन्मान* *डॉ. राजीव पोतदार यांच्यावर भाजपचा विश्वास* *शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल*

🔊 Listen to this *समर्पण आणि अनेक वर्षांच्या मेहनतीचा सन्मान* *डॉ. राजीव पोतदार यांच्यावर भाजपचा …