*कुरखेडा पंचायत समिती:उपसभापतिपदाच्या उमेदवारीवरून कांग्रेसमध्ये रस्सीखेच*
गढ़चिरोली प्रतिनिधि -सूरज कुकुडकर
कुरखेडा,ता.३०: पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या ३१ डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत सभापतीपद अनुसूचित जमातीच्या महिलेकरिता राखीव असून, पंचायत समितीत बहुमतात असलेल्या कांग्रेसकडून यावेळी सभापती व उपसभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
दहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीत कांग्रेस ६ भाजपा ३ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असले; तरी अपक्ष सदस्याने नुकताच कांग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे कांग्रेसची संख्या वाढून ती ७ झाली आहे आदिवासीबहुल असलेल्या कुरखेडा तालुक्याचा समावेश ‘पेसा’ मध्ये असल्यामुळै तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच व पंचायत समितीचे सभापतीपद हे आदिवासींसाठी राखीव असते. त्यामुळे उपसरपंच व उपसभापतीपद गैरआदिवासीला देऊन सामाजिक समतोल साधण्याचे काम राजकीय मंडळी करीत असतात. परंतु यावेळी मात्र कुरखेडा पंचायत समितीच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सध्याचे विद्यमान उपसभापती मनोज दुनेदार यांच्याशिवाय कांग्रेसकडे दुसरा ओबीसी उमेदवार नाही. त्यामुळे कांग्रेस पक्ष पुन्हा दुनेदार यांची दावेदारी मान्य करतो की, अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या श्रीराम दुगा यांना उमेदवारी देऊन सभापती व उपसभापती या दोन्ही पदांवर आदिवासी समाजाचीच व्यक्ती बसवून ओबीसी समाजाच्या प्रतिनिधीला दूर सारतो, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे
श्रीराम दुगा हे पंचायत समितीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. परंतु यंदा उन्हाळ्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते कांग्रेसवासी झाले, हे येथे उल्लेखनीय.
Maharashtra News Media सच की आवाज