*ग्राम पंचायत स्तरावर कृषी ग्रंथालय निर्मीती*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतुन साकारलेला शेतक-यांच्या हिताचा उपक्रम*
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
चंद्रपुर – राज्याचे माजी अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन ग्राम पंचायत स्तरावर कृषी ग्रंथालय निर्मीतीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर सक्रीयपणे राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्हयामध्ये रोजगार मिळविण्याचे मुख्य साधन शेती हे असून विविध पिकांच्या लागवडीसंदर्भात व उत्पादनासंदर्भात माहिती मिळण्याकरिता तसेच शेतीसंबंधीची माहिती मिळणे, प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर शेती करणे सोपे व्हावे यासोबतच पीक उत्पादनात वाढ होवून पर्यायाने त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे हा या उपक्रमामागील सुधीर मुनगंटीवार यांचा मुळ उद्देश होता. शेतक-यांना ग्राम पंचायत स्तरावरच कीड रोग नियंत्रण, आधुनिक पध्दतीने सुधारित तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत व्हावी यासाठी ही योजना राबविण्याचे त्यांनी निश्चीत केले. सदर योजनेच्या माध्यमातुन प्रत्येक ग्राम पंचायतीला पुस्तकांच्या 2 आलमारी व 227 कृषी विषयक पुस्तकांचा संच उपलब्ध करण्यात आला आहे. आतापर्यंत ही योजना जिल्हयातील 800 ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला 40 हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी 3 कोटी 20 लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षीक योजनेतील नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये सदर योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातुन जिल्हयातील शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगतशील शेतकरी होण्यास मोलाची मदत होणार आहे.
या उपक्रमासह टाटा ट्र्रस्ट च्या सहाय्याने सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयातील चंद्रपूर, मुल ,पोंभुर्णा, बल्लारपूर, जिवती, गोंडपिपरी आणि नागभीड या तालुक्यांमध्ये सधन शेतकरी प्रकल्प राबविला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहाय्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. मुल येथे स्वतंत्र कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातुन सामुहीक विहीर बांधकामासाठी निधी त्यांनी मंजूर केला आहे. चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातुनच भाजीपाला क्लस्टर ला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. ग्राम पंचायत स्तरावर कृषी ग्रंथालय निर्मीतीचा उपक्रम जिल्हयाच्या कृषी विकासाला चालना देणारा ठरणार आहे.
Maharashtra News Media सच की आवाज