*रामटेक पंचायत समितीवर काँग्रेसचा कब्जा*

काँग्रेसच्या कला ठाकरे सभापती

रवींद्र कुमरे उपसभापती.
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक पंचायत समितीच्या सभापतीपदावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सौ.कला उमेश ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपसभापती पदासाठी निवडणूक संपन्न होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र रामप्रसाद कुमरे यांनी पाच विरुद्ध चार मतांनी विजय संपादन केला.सात वर्षानंतर पुन्हा रामटेक पंचायत समिती वर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत रामटेक तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी तीन गटांमध्ये व पंचायत समितीच्या दहा गणांपैकी पाच ठिकाणी विजय संपादन केला होता.या निकालांनी रामटेक पंचायत समितीचा सभापती काँग्रेसचा होणार हे निश्चित मानले जात होते. पंचायत समितीचे सभापतीपद नामाप्र महिला गटासाठी राखीव असल्याने मनसर गणातून निवडून आलेल्या सौ. कला ठाकरे यांची सभापतीपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती झालेले रवींद्र कुमरे हे आदिवासी भागातील वडंबा गणातून निवडून आले आहेत.पंचायत समितीच्या एकूण 10 सदस्यांपैकी 5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,4 शिवसेना व भाजपाचा एक सदस्य असे बलाबल आहे. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.भाजपाचे नरेंद्र बंधाटे वगळता अन्य सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज