*खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र सर्वोत्तम*

*सुनिल केदार यांनी केले खेळाडूंचे अभिनंदन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
मुंबई: गुवाहाटी येथील खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत युवाखेळाडूंकडून 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके मिळवून महाराष्ट्राने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
श्री. केदार म्हणाले, खेलो इंडियास्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल ठरला आहे. ही बाब महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अभिमानाची आहे. अशीच कामगिरी यापूढेही खेळाडूंनी करावी यासाठी युवक कल्याण विभागाच्यावतीने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरीता विविध उपक्रम आणि सुविधा पुरविण्यात येतील.
केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आसाममधील गुवाहाटी येथे 9 जानेवारी पासून सुरु झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत देशातील विविध स्पर्धेतील सुमारे 6500 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत तब्बल 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके पटकावली. यात 77 रौप्य आणि 101 कांस्य पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये जलतरण पटूंनी सर्वाधिक पदकांची कमाई केली.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गेल्यावर्षी झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 227 पदकांसह सर्वसाधारण विजेते पद पटकाविले होते. आज त्यात आणखी पदकांची भर घालत महाराष्ट्राने घवघवीत यश संपादन केले आहे. क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेते पदाचा चषक प्रदान करण्यात आला.
शासनाच्या उत्तम सुविधांमुळे अव्वल स्थान
खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्रातून 590 खेळाडूंनी 19 क्रीडा प्रकारात आपल्या क्रीडा नैपुन्याची चमक दाखविली. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने खेळाडूंकरीता उत्तम सुविधा पुरविल्या. तसेच सराव शिबिराचे आयोजन केले. त्यामुळेच स्पर्धेत खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत पदाकांचा द्विशतकांचा आकडा पार केला.
Maharashtra News Media सच की आवाज