*नक्षल्यांनी केली मोहफुले वेचणाऱ्या इसमाची हत्या*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
कोरची: पत्नीसह शेतशिवारात मोहफुले वेचण्यास गेलेल्या इसमाची नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजता कोरची तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत कोहका-मोकासा गावाजवळ घडली. जिवता गणपत रामटेके(४५) रा.कोटगूल असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी ही हत्या केली आहे.
कोटगुल येथील जिवता रामटेके हा पत्नी नीलम हिच्यासह आज पहाटे कोहका-मोकासा येथील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. तेथे एक नक्षल महिला मोहफुले वेचत होती. तिने जिवता रामटेची पत्नी नीलम हिला तिच्या पतीचे नाव विचारले. काही क्षणातच दोन नक्षलवादी तेथे आले. त्यांनी नीलमला पकडून ठेवले आणि दुसऱ्या नक्षल्यांनी जिवताला दोनशे मीटर अंतरावर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. मात्र, आपला पती जिवंत असल्याचे लक्षात येताच नीलमने कोटगूल हे गाव गाठून तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. जिवताला कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु तेथे उपचार न झाल्याने त्यास कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच जिवता रामटेके याने प्राण सोडला.
*तालुक्यात दहशत*
जिवता रामटेके यास एक मुलगा व दोन मुली असून, येत्या २६ एप्रिलला मनिषा नामक मुलीचे लग्न नियोजित होते. या घटने मुळे रामटेके कुटुंबावर आघात झाला आहे. सदर घटनेचा तपास कोरची पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलिस मदत केंद्राचे अधिकारी श्री.राऊत करीत आहेत. चालू आठवड्यात नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन केलेली ही दुसरी हत्या आहे. यामुळे तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज