Breaking News

*विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार*

*विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार*

गढ़चिरोली प्रतिनिधी- सूरज कुकुडकर

गडचिरोली: कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविला आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा यांनी आज निर्गमित केला.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, तर गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नियुक्तीबाबतच्या शासन निर्णयात अंशतः बदल करुन गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासोबतच भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे.

*वडेट्टीवारांना कायमस्वरुपी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद द्यावे*

सध्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काम पाहत आहेत. परंतु शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा आहे. ठाणे जिल्हा हा शिंदे यांचा गृहजिल्हा असल्याने आणि गडचिरोलीचे अंतर दूर असल्याने त्यांचे या जिल्ह्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. कोरोनामुळे केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकदाही गडचिरोलीला भेट दिली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत जनतेत नाराजीचा सूर आहे. याउलट विजय वडेट्टीवार हे गडचिरोलीचे भूमिपूत्र असल्याने त्यांना या जिल्ह्याच्या संपूर्ण परिस्थितीची जाण आहे.

*प्रतिकूल परिस्थिति ची जाण*

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर श्री.वडेट्टीवार तीनदा गडचिरोलीत आले. त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन गरजूंना स्वत:कडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री असल्याने वडेट्टीवार यांनी येथील प्रशासनाकडून परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती घेत असतात. चंद्रपूरचे पालकमंत्री असल्याने वडेट्टीवार तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वडेट्टीवारांचे नेतृत्व आणि प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे चंद्रपुरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. आता त्यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद तात्पुरते देण्यात आल्याने चंद्रपूरप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यावरही त्यांना देखरेख ठेवता येईल. परंतु या जिल्ह्याच्या एकूणच विकासासाठी वडेट्टीवार यांना सत्ता असेपर्यंत कायमस्वरुपी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …