*सीसीआयचे खरेदी केंद्र सुरु होऊनही शेतकरी निराशच*
*कवडी मोल दरात “पांढरं सोनं” विकण्याची वेळा*
*हवालदिल बळीराज्याच्या समस्येवर मायबाप सरकार लक्ष देतील काय*
विशेष प्रतिनिधी पाटणसावंगी*
*सावनेरः तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा अडचणी संपता संपत नाहीय, आधी अवकाळी पावसामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे.देशातील बाजारपेठसुद्धा बंद आहे. अशा परिस्थितीत कापसाचा भाव बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.*
*सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र योग्य दराने शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी करीत होते, मात्र त्यानंतर एक महिन्यापासून लाँकडाऊन असल्यामुळे कापूस खरेदी बंद होती. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून राहिला. आज नाही तर उद्या सी सी आय ची खरेदी सुरु होईल या आशेने शेतक-यांनी एक महिना वाट पाहिली परंतु शेतीचा हंगाम एक महिन्यावर आल्याने बी-बियाणांची जुळवाजुळव करणे व बँकेचे कर्ज भरायचे असल्यामुळे शेतकरी खाजगी कापूस विक्री केंद्राकडे वळले. मात्र शेतकऱ्यांच्या विवशतेचा फायदा घेत खाजगी कापूस जिनिंग केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावाने खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेचणीचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र किती दिवस कापूस घरी ठेवणार आणि पैशाच्या अभावी मिळेल त्या किमतीत कापूस विकत असून शेतकरी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आहे.*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिल्या होत्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही खरेदी करण्यात यावी, असेहि त्यांनी स्पष्ट सांगितले होते.*
*त्याकडे लक्ष देउन नंतर सीसीआयला कापूस विक्री करणे व खासगी जिनिंगमध्ये नोंदणी करण्यासाठी सावनेर तालुक्यात शेतकऱ्यांना “लिंक’ देण्यात आली होती. ही लिंक शुक्रवार(ता.24) दुपारी उघडली आणि सोमवार (ता.27)बंद करण्यात आली. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणी होऊ शकल्या नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत 3600 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही दररोज 20 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करेल. तरी 3600 शेतकऱ्यांचा नंबर कधी लागेल असा प्रश्न कापूस उत्पादकाला पडला. दरवषीं 15 मेपर्यंतच कापूस खरेदी करण्याची परंपरा आहे. चालू महिना संपत आला असून पुढील मे महिन्यात 15 दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस कसा खरेदी करणार, अशी बिकट परिस्थिती समोर आलेली आहे.*
*सीसीआयकडून चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भर सीसीआयच्याच केंद्रावरच आहे. आधीच सीसीआय ने लॉकडाऊनमुळे खरेदी केंद्र उशीराने सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्याप्याराना हमीभावापेक्षा तब्बल एक ते दीड हजार रुपये कमी दराने विक्री करावा लागला. खासगी कापूस केंद्रावर दररोज 100 च्या गाड्यांच्यावर शेतकऱ्यांचा कापूस 4000 रुपये ते 4500 रुपये प्रतिक्विंटल या दराने घेतला जात आहे.शासनाच्या हमी भावानुसार 5355 रुपये पहिल्या ग्रेडचा कापूस आहे. मात्र, सरकारी कापूस केंद्रावर 20 शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात असल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी चिंतेत पडलेले दिसत आहे.*
*कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधीच अवकाळी पावसाने अडचणीत आणले आहे. शासनाकडून
अद्यापपर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही.त्यातच कापसाला हमीभावाएवढी रक्कम देखील
मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.शासनाने आमचा अंत पाहू नये. हमीभावापेक्षा कित्येक पटीने कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे. यातून शेतकऱ्यांची लूट चालविली जात आहे.तसेच माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे नोंदणी झाली असून माझा नंबर 2-3 महिन्याने लागेल तर माझ्या कापसाच्या वजनात घट होईल, शासनाने त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी*