*राज्यातील नूतनीकरण न झालेल्या बांधकाम कामगारांना मुदतवाढ देण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी*
*सकारात्मक कार्यवाही करण्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन*
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- राज्यातील नूतनीकरण न झालेल्या बांधकाम कामगारांना मुदतवाढ देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या मागणीसंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना ईमेलद्वारे पत्रे पाठविली असून दिलीप वळसे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा सुध्दा केली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन राज्यात अंदाजे 22 लाख 50 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. या बांधकाम कामगारांपैकी सुमारे 11 लाख बांधकाम कामगारांचे नूतनीकरण झाले असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे इतर बांधकाम कामगार नुतनीकरणापासून वंचित आहेत. राज्य शासनाने नुकतेच 2000 रूपयांचे अर्थसहाय्य बांधकाम कामगारांना जाहीर केले, ते अनुदान नुतनीकरण झालेल्या बांधकाम कामगारांनाच देण्यात आले. नुतनीकरण न झालेले बांधकाम कामगार यापासून वंचित राहील. लॉकडाऊनच्या परिस्थीतीमुळे बांधकाम कामगारांचे नुतनीकरण होवू शकत नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देणे आवश्यक आहे, अशी भूमीका कामगार मंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी विशद केली. सदर मागणी तपासून यासंदर्भात त्वरीत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
Maharashtra News Media सच की आवाज