*गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधित इसमाचा हैदराबादमध्ये मृत्यू*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली: दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या सिरोंचा तालुक्यातील इसमाचा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे काल(ता.१)संध्याकाळी मृत्यू झाला. राजन्ना भिमय्या कोटा(४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्तीचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.
राजन्ना कोटा हा सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील मूळ रहिवासी असून, त्याला १२ वर्षांपासून ह्दयविकाराचा आजार होता. त्यावरील उपचारासाठी तो अधूनमधून हैदराबाद येथील उस्मानिया इस्पितळात जात होता. काही दिवसांपूर्वी तो चंद्रपूरला गेला होता. तेथून तो हैदराबादला गेला. तेथे ३१ मे रोजी तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले. त्यानंतर उस्मानिया इस्पितळाने त्याला कोरोनाचे रुग्ण असलेल्या हैदराबाद येथील म.गांधी इस्पितळात रवाना केले. तेथेही राजन्ना कोटा हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याची खात्री झाली. तेव्हापासून तो तेथेच उपचार घेत होता. काल संध्याकाळी साडेसहा वाजता राजन्नाचे निधन झाल्याचे म.गांधी इस्पितळाच्या डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना कळविले. विशेष म्हणजे, हैदराबाद येथून परत आल्यानंतर राजन्नाची पत्नी सिरोचा येथे विलगीकरणात आहे. त्यामुळे ती अंत्यसंस्काराला जाऊ शकत नसून, अंत्यसंस्कार हैदराबाद येथेच उरकण्याविषयीचे पत्र राजन्नाच्या पत्नीने म.गांधी इस्पितळाच्या व्यवस्थापनाला दिले आहे. आज गडचिरोली जिल्हा प्रशासनाने अधिकृतरित्या ही माहिती दिली.