कोविड-१९ प्रयोगशाळेचे वडेट्टीवारांच्या हस्ते उद्घाटन
५० मिनिटांत कळणार निदान
गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज झाले. या प्रयोगशाळेतील तपासणीमुळे संशयित रुग्ण हा कोरोना पॉझिटीव्ह नसल्याबाबत अवघ्या ५० मिनिटांत खात्री केली जाणार आहे.
क्षयरोगाच्या चाचणीत वापरल्या जाणाऱ्या या निदान यंत्रांचा वापर कोविड-१९ तपासणी करण्यासाठी आयसीएमआर कडून नुकतीच परवानगी देण्यात आली होती. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्यानंतर गडचिरोली जिल्हयातही या प्रकारच्या चाचणीला परवानगी देण्यात आली. त्यानुसार प्रयोगशाळा सुरु करुन तिचे उद्घाटन करण्यात आले. या प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटीव्ह नसल्याबाबत ५० मिनिटांत खात्री केली जाणार आहे. मात्र, रुग्णाला कोविड-१९ ची बाधा झाल्याची खात्री होण्यासाठी नागपूर येथेच संशयितांचे नमुने पाठविण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे जिल्हयातील जास्त जोखमीच्या रूग्णांचे अहवाल तत्काळ स्वरूपात तपासता येतील, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री उपस्थित होते.
*गडचिरोली शहरात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण*
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आज चक्क गडचिरोली शहरात आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
आज संध्याकाळी ६ वाजता आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, गडचिरोली शहरातील हा रुग्ण मुंबई येथून गडचिरोलीला आला होता. तेव्हापासून तो संस्थात्मक विलगीकरणात होता. त्यामुळे आता कोरोना पॉझिटीव्ह एकूण रुग्णांची संख्या ४० झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर १९ जण आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना अॅक्टीव रुग्णांची संख्या २० असून, त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.