*मिरची पावडर टाकून दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रयत्न*
*७ लाख,६३ हजार ६७० रुपये थोडक्यात बचावले*
*अशा प्रकारची ही मौदा येथे दुसरी घटना*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : पेट्रोल पंपावरील पेट्रोल, डिझेल विक्रीचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना मागेहून दुचाकीने येऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मिरची पावडर डोळ्यात टाकून दिवसाढवळ्या लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही थरकाप सुटणारी घटना दि.३० जुन रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान मौदा येथे घडली.
कामठी तालुक्यातील वडोदा येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भारत पेट्रोल पंपावरील लेखापाल (कँशियर) म्हणून कार्यरत असलेल्या सोमेश्वर खुशालराव कंडे (२८) हे दैनंदिन कामकाजा प्रमाणे तेथील दुसरा कर्मचारी आकाश मनोहर ठवकर यांच्या सोबत दुचाकीवरून मौदा येथिल भारतीय स्टेट बँकेत पैसे जमा करण्यासाठी ७ लाख,६३ हजार ६७० रुपयेनी भरलेली बॅग घेऊन निघाले. कन्हान नदी पार केल्यानंतर मौदा-पावडदौना बायपासवर वळले. तेवढ्यातच तोंडाला पांढरे दुपट्टे बांधून एका दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्तींनी अगदी बरोबरीने जवळ येऊन मिरची पावडर (तिखट) सोमेश्वर कंडे व आकाश ठवकर यांच्या अंगावर फेकले. व चालत्या दुचाकीला लाथ मारुन खाली पाडले. पैशाची बॅग घेऊन मागे बसलेल्या सोमेश्वर कंडेच्या जवळची बॅग हिसकावू लागले. लगबगीने बॅगचे कसे तुटले पण सोमेश्वर नी बॅग सोडली नाही. अज्ञात लुटारू तेवढ्यावरच थांबले नाहीत तर जवळ बाळगलेले धारदार शस्त्र काढून मारण्याचा प्रयत्न केला असता, सोमेश्वर व आकाश कसेबसे बॅग घेऊन टाका परिसरातील हनुमान मंदीराकडे पळाले. तिकडे नागरिकांचे रेलचेल असल्याचे पाहून लुटारुंनी काढता पाय घेतला.
सोमेश्वर कंडे यांच्या फिर्यादीवरून अंदाजे २५-३० वयोगटातील असलेल्या लुटारूंनी मिरची पावडर टाकल्यामुळे दुचाकी क्रं. पहाता आले नाही. तसेच तोंडावर दुपट्टे बांधून असल्यामुळे ओळखता आले नाही. अज्ञात लुटारूंनी दुचाकीवरून पाडल्यामुळे सोमेश्वर व आकाश यांना बरीच दुखापत झाली आहे.
अशाच प्रकारची घटना यापूर्वी मौद्यात घडली होती. एका व्यसनाधीन इसमाने व्याजाने पैसे घेतलेल्या सावकारांच्या जाचाला कंटाळून येथिल बाभरे पेट्रोल पंपावरील सुपरवाईजर बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असताना त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटण्याचा प्रयत्न केला होता हे विशेष.
सदर घटनेतील अज्ञात व्यक्तींवर कलम ३९३/३४ गुन्हा नोंद करुन. मौदा पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज