*गायी वाटप घोटाळा: आरमोरीत ५ जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी जप्त केल्या ५३ गायी*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर
गडचिरोली : बहुचर्चित फिजवाल गायी वाटप घोटाळ्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हे दाखल केले असून, आज ५३ फ्रिजवाल गायी जप्त करुन त्या पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द केल्या.
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लाभार्थी पशुपालकांना फ्रिजवाल प्रजातीच्या गायी वाटप करावयाच्या होत्या. हे काम प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना कंपनी लिमिटेडकडे देण्यात आले होते. परंतु कंपनीने ऑक्टोबर २०१९ मध्ये पात्र लाभार्थींना गायी न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावली होती. यासंदर्भात वासुदेव वंजारी यांनी ६ जानेवारी २०२० रोजी केलेल्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी ५ जणांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२०(ब) अन्वये गुन्हे दाखल केले होते. त्यातील आरोपी घनश्याम वासुदेव तिजारे यास ७ जानेवारीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तो जामीनावर सुटला. दोन दिवसांपूर्वी श्याम श्रीहरी पराते, अरविंद श्रीहरी पराते व प्रकाश केशव तिजारे यांना अटक करण्यात आली, तर नरेश घनश्याम तिजारे हा फरार आहे. या कारवाईनंतर आज आरमोरीचे पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह आरमोरी तालुक्यातील आरमोरी, अतरंजी, डोंगरगाव, पळसगाव, शिवणी, करपडा व देसाईगंज तालुक्यातील कुरुड आणि कोंढाळा येथे छापे टाकून ५३ फ्रिजवाल गायी जप्त केल्या. त्यानंतर या गायी पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सुपूर्द करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, सहायक पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक बोंडसे, चव्हाण यांनी ही कारवाई केली.
Maharashtra News Media सच की आवाज